Fertilizer (खते)

जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि तिचा कस राखून ठेवण्यासाठी मुख्यत्वे खतांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे रासायनिक खते, सेंद्रिय खते आणि जीवाणू खते असे खतांचे प्रकार आहेत. खतांच्या वापरामुळे जमिनी कसदार बनतात आणि पिकांची उत्तम वाढ होते. जीवाणू खतांमध्ये ॲझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, असिटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ, अझोला, इ. चा समावेश होतो. ही जीवाणू खते नैसर्गिक खते म्हणूनही ओळखली जातात. ही खते सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त असून त्यामुळे रासायनिक खतांची बचत होऊन पर्यावरणाचे संवर्धन होते.
१) नत्र स्थिरीकरण करणारी जीवाणू खते : अ) ॲझोटोबॅक्टर : हे जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करतात. ते प्रामुख्याने वातावरणातील मुक्त स्वरूपात व विपुल प्रमाणात (७८ टक्के) असणारा नत्रवायू स्थिरीकरण करून पिकास उपलब्ध करून देतात. हे जीवाणू खत शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल, तृणधान्य पिकांना उपयोगी पडते. उदा., ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा, इ.
ब) ॲझोस्पिरिलम : हे जीवाणू ॲझोटोबॅक्टरपेक्षा अधिक कार्यक्षम असून सहजीवीपद्धतीने कार्य करतात. ते तृणधान्य, भाजीपाला व फळझाडे पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहून नत्र स्थिरिकरणाचे कार्य करतात.
क) ॲसिटोबॅक्टर : हे जीवाणू ऊस व शर्करायुक्त पिके उदा., मका, ज्वारी, बीट, इत्यादीमध्ये सहजीवीपद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. ते जीवाणू ऊसाच्या कांड्या, पाने व मुळांमध्ये वास्तव्य करतात. हे जीवाणू अंतरप्रवाही असल्यामुळे स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये जास्तीत जास्त वापर केला जातो. ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्वारे हे जीवाणू प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात. हे जीवाणू ऊस पिकास ५० टक्के नत्राचा पुरवठा करतात. हे जीवाणू इंडोल ॲसेटिक ॲसिड तयार करत असल्यामुळे पिकांच्या मुळाच्या वाढीस मदत होते.
ड] रायझोबियम : या जीवाणूंचे कार्य सहजीवीपद्धतीने चालते. हे जीवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर गाठी निर्माण करतात. हवेतील नत्रवायू शोषून घेऊन मुळांवाटे पिकास उपलब्ध करून देतात. एकच रायझोबियम जीवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे त्याचे वेगवेगळे सात गट असून वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ठ प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू खत वापरतात.
इ] निळे हिरवे शेवाळ : हे एकपेशीय किवा फांद्यासह अथवा फांद्या विरहीत तंतू असतात. भात पिकांमध्ये निळे हिरवे शेवाळाचा वापर करतात, कारण भात खाचरामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे शेवाळाची वाढ चांगली होते.